पुणे : सिंहगड रस्त्यावरील एकता नगरच्या पलीकडील कर्वेनगर वारजेच्या नदीपात्रात (Mutha River basin) ३० डम्पर टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या प्रकरणी जागा मालक गजानन विठठलराव पवार यांना पालिकेने नोटीस पाठविली असुन साडेसात लाख रुपयांचा दंड केला आहे. (A fine of seven and a half lakhs for illegal filling in the Mutha riverbed)
शहर आणि धरणक्षेत्रात मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला गेला. केवळ ३५ हजार क्युसेस विसर्गामुळे पुण्यातील सिंहगड रस्त्यासह नदीकाठच्या भागांमध्ये अनेक सोसायट्या, घरे, दुकानांमध्ये पाणी शिरले. नाले, रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. पावसाच्या या हाहाकारामुळे पुण्यातील नदीकाठच्या सिंहगड रस्ता परिसरातील विठ्ठलनगर, एकतानगरी, निंबजनगर, पाटील इस्टेट, शांतीनगर, तसेच, येरवडा, पुलाची वाडी आदी भागात कंबरेइतके पाणी होते. या परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. नदीकाठ लगतच्या परिसरात आपला जीव वाचवण्यासाठी सगळ्यांचीच धडपड सुरू होती. तब्बल ५ हजार नागरिकांचे स्थलांतर करावे लागले. तर, विविध दुर्घटनांमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला होता.
या पूरजन्य परिस्थितीनंतर मुळा-मुठा नदीच्या सुशोभीकरण प्रकल्पाच्या नावाखाली महापालिकेने नदीमध्ये भराव टाकून नदीचे पात्र अरुंद केल्यामुळेच पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, यास भाजपच कारणीभूत असल्याची टीका राजकीय पक्षांसह पर्यावरण प्रेमींकडून झाली. सर्व क्षेत्रांतून टीका झाल्यानंतर झोपी गेलेल्या महापालिका प्रशासनाला जाग आली. या आरोप आणि टीकांमुळे पालिकेने कारणे शोधायला सुरुवात केल्यानंतर पालिकेला कर्वे नगर ते शिवणे या भागातील नदीपात्राच्या पूररेषेत सुमारे चार ते पाच एकर क्षेत्रांत भूखंड तयार केल्याचे समोर आले. मात्र, प्रत्यक्षात ही जागा १५ ते २० एकर असल्याचे बोलले जात आहे.
या राडारोड्यामुळे नदीपात्रात एक भिंत तयार झाली आहे. या भरावामुळे नदीने तिचे पात्र सोडल्याने सिंहगड परिसरात पाणी शिरल्याचा आरोप केला गेला. त्यामुळे झोपी गेलेल्या महापालिका प्रशासनाने सुमारे ३०० ट्रक राडारोडा काढून घेतला. भराव काढल्यानंतर महापालिकेने पुन्हा भराव टाकला जाऊ नये, यासाठी उपाययोजना करणे गरजेचे होते. मात्र, जवळपास पावसाळा संपत आल्याने महापालिकेला (Pune Municipal Corporation) या सर्व गोष्टींचा विसर पडला. त्यामुळे पुन्हा बेकायदा भराव टाकून प्लॉट करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी पुणे महापालिकेने जागा मालक गजानन विठठलराव पवार यांना नोटीस बजाविली आहे. त्यात एमआरटीपी ॲक्ट कलम ५२ घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ व पर्यावरण कायाघान्वये दंड वसुल करून गुन्हा दाखल करण्यात येईल. नदीपात्रात ३० ट्रक राडारोडा टाकल्याप्रकरणी प्रति ट्रक २५ हजार रूपये या प्रमाणे ७ लाख ५० हजार रूपये प्रशासकीय सेवाशुल्का पोटी वारजे कर्वनगर क्षेत्रिय कार्यालयाकडील आरोग्य विभागामध्ये हे पत्र मिळताच २४ तासाच्या आता भरावा. अन्यथा पुढील कारवाई केली जाईल अशी नोटीस वारजे कर्वनगर क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विजय नायकल यांनी बजाविली आहे.