नामांकीत अभियांत्रिकी कॉलेजांमध्ये झालेले प्रवेश तातडीने रद्द करुन गुणवत्त विद्यार्थ्यांना प्रवेश द्या

पुणे. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील नामांकीत अभियांत्रिकी कॉलेजांमध्ये (College of Engineering) झालेले प्रवेश तातडीने रद्द करून, त्या जागांवर गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या (डीटीई) कार्यालयात ठिय्या मांडला होता. पुराव्यांच्या आधारावर संबंधित कॉलेजांमधील प्रवेश रद्द करण्याचा अहवाल तातडीने सीईटी सेलकडे पाठविण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव (Technical Education Joint Director Dr. Dattatraya Jadhav) यांच्याकडे केली. (Immediately cancel admissions to engineering colleges and admit quality students)

पुणे व पिंपरी चिंचवड (Pune, Pimpri Chinchwad) परिसरातील १२ नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांनी कॅप राऊंडनंतर शिल्लक राहिलेल्या जागा (अगेन्स्ट कॅप) ; तसेच संस्थास्तरावरील मॅनेजमेंट कोट्यातील (Management Quota) जागांसाठी राबविलेल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये गोंधळ घातला आहे. पुण्यातील शैक्षणिक संस्थांकडून राबविल्या जाणाऱ्या नियमबाह्य प्रवेश प्रक्रियेची तक्रार विद्यार्थी आणि पालकांच्या वतीने युवासेनेचे राज्य सहसचिव कल्पेश यादव यांनी सीईटी सेलकडे केली होती. त्यानंतर नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातील अगेन्स्ट कॅप आणि मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेश प्रक्रियेत सीईटी सेलच्या माहिती पुस्तिकेतील नियम क्रमांक १३ चे पालन होत नसल्याचे निरीक्षण सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी नोंदवले होते. त्याचप्रमाणे महाविद्यालयांना आवश्यक सूचना देण्याचे आदेश डीटीईला दिले होते. मात्र, सीईटी सेलच्या सुचनेनुसार डीटीईने अद्याप कोणतेही कारवाई केली नसल्याचे चित्र आहे.

या कारणामुळे अगेन्स्ट कॅप; तसेच मॅनेजमेंट कोट्यातील जागा मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार करून, कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना विकण्यात आल्या. या प्रकाराबाबत विद्यार्थी आणि पालकांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केल्यावर, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्याचप्रमाणे काही ठिकाणी संस्थेच्या प्रतिनिधींनी अर्वाच्या भाषेत संवाद साधत, विद्यार्थ्यांना हाकलून दिले. या संपूर्ण प्रकारात सीईटी सेल, डीटीई किंवा प्रवेश नियामक प्राधिकरणाकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी डीटीई कार्यालयात कल्पेश यादव यांच्या नेतृत्त्वात काही काळासाठी ठिय्या मांडला होता. यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी कॉलेजांच्या विरोधात तक्रारींचा पाढा वाचत, प्रवेशाची संधी देण्याबाबत मागणी केली. त्याचप्रमाणे कॉलेजांच्या विरोधात कारवाई केल्याचा अहवाल सादर करण्याची मागणी केली.

 

 

 

विद्यार्थी आणि पालकांच्या कॉलेजांच्या तक्रारींची दखल घेण्यात आली आहे. या तक्रारींच्या अनुषंगाने तयार केलेला अहवाल सीईटी सेलकडे पाठविण्यात येईल.

डॉ. दत्तात्रय जाधव, सहसंचालक, डीटीई

 

 

 

तंत्रशिक्षण संचालनालयाने तक्रारीत नमूद केलेल्या कॉलेजांच्या विरोधात केलेल्या कारवाईचा अहवाल तातडीने जाहीर करून, तो सीईटी सेलकडे पाठवावा. सीईटी सेलने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, याची काळजी घ्यावी. अन्यथा डीटीई आणि सीईटी सेलला जबाबदार धरण्यात येईल.

कल्पेश यादव, सहसचिव, युवासेना

 

 

विद्यार्थी आणि पालकांच्या मागण्या

कॅप फेरीनंतर रिक्त राहणाऱ्या जागा (Against Cap); तसेच मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेश तत्काळ रद्द करावे. प्रवेश रद्द केल्यानंतर, गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना प्रवेशाची तत्काळ संधी उपलब्ध करून द्यावी. अभियांत्रिकी महाविद्यालय वर प्रशासक नेमण्यात यावा. त्याचप्रमाणे त्रयस्थ समितीकडून संपूर्ण आर्थिक व्यवहाराची चौकशी करावी. ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र असतांनाही, ते केवळ सीईटी सेलच्या नमुन्यात नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले आहेत. या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र काढण्यासाठी मुदत द्यावी किंवा प्रवेशांना मान्यता द्यावी.

 

 

Local ad 1