अबब..! पुण्यात तब्बल ५ हजार शस्त्रक्रिया लांबणीवर

खाजगी डॉक्टरांचा संपाचा परिणाम

 

पुणे : काेलकात्यामध्ये महिला डाॅक्टरवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी इंडियन मेडिकल असाेसिएशन Indian Medical Association (आयएमए) कडून शनिवारी ओपीडी बंद (OPD closed) ठेवण्यात आली. दरराेज खासगी रुग्णालयांत ५० हजार रुग्ण बाहयरूग्ण विभागांत (ओपीडी) मध्ये उपचार घेतात. त्यांनाही उपचारांपासून वंचित राहावे लागले. तर संपाबाबत माहीती नसल्याने सकाळच्या वेळी अनेक रुग्ण ओपीडीमध्ये उपचार न घेताच माघारी फिरले. तर काहींनी सरकारी रुग्णालये गाठली. (Five thousand surgeries were postponed as doctors in Pune went on strike)

 

 

 

काेलकात्यातील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयातील दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार आणि तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ आयएमए ने शनिवारी सकाळी ६ ते रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत २४ तासांचा एकदिवसीय देशव्यापी सेवाबंद संप पुकारला हाेता. हा संप पुण्यासह संपूर्ण राज्यात असून, यादरम्यान खासगी रुग्णालयांतील तातडीच्या सेवा वगळता बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) बंद हाेत्या. दरम्यान संप १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा आयएमए कडून करण्यात आला.

 

 

 

‘आयएमए’ने पुकारलेल्या बंदला प्रतिसाद देत खासगी रुग्णालयातील ओपीडी आणि लहान दवाखाने बंद ठेवण्यात आले होते. या संपामुळे मात्र, सर्वसामान्य रुग्णांचे हेलपाटे झाले. जिल्हा, व उपनगरांतून उपचारासाठी आलेल्या अनेकांना संपाची कल्पना नसल्याने ते शहरात उपचारासाठी आले. मात्र, खासगी रुग्णालयातील ओपीडी, दवाखाने बंद असल्याने मात्र त्यांना विना तपासणीच माघारी फिरले. त्यापैकी काहीजण ससून रुग्णालयात तर काही महापालिका रुग्णालयांत गेले. त्यामुळे तेथे रुग्णांचा ताण वाढला होता. ससून रुग्णालयातही रुग्णांची सकाळपासून गर्दी झाली होती.

 

 

 

 

 

 महापालिकेची ओपीडी अर्धा दिवस…

एकीकडे खासगी रुग्णालयांमध्ये ओपीडी बंद हाेती तर दुसरीकडे शनिवार असल्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयातील ओपीडी देखिल एक वाजेपर्यंतच सुरु होती. एरवी ती सायंकाळी पाच वाजेपर्यंत सूरू असते. त्यामुळे अनेक रुग्ण खासगी तसेच शासकीय रुग्णालयातील उपचारापासून देखिल वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर आली. तसेच महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातही गर्दी वाढली हाेती. प्रत्येक शनिवारी येथे सुमारे एक हजार ते बाराशे रुग्णांची असणारी ओपीडी शनिवारी दुपारी एक पर्यंत दीड हजार रुग्णांपर्यंत पोहचली होती.

 

 

 

 

   तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात आल्याने शहरातील छाेटया आणि माेठया मिळून ९०० रुग्णालयांमधील सुमारे ४ ते ५ हजार शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. तर ५० ते ६० हजार ओपीडी मध्ये रुग्णसंख्या तपासणी जाते. या संपात आयएमए च्या सर्व डाॅक्टरांनी सहभाग घेतला. तसेच बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय येथे आयएमए आणि इतर वैद्यकीय संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

 – डाॅ. राजन संचेती, अध्यक्ष, आयएमए, पुणे

 

 

 

काेलकात्यामधील महिला डाॅक्टरच्या हत्येचा निषेध 

रुग्णालयातील संपूर्ण ओपीडी बंद ठेवण्यात आली हाेती. तसेच तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात आल्या हाेत्या. रुग्णालयातील डाॅक्टरांनी काेलकात्यामधील महिला डाॅक्टरच्या हत्येचा निषेध व्यक्त केला.

 

 

 

 

Local ad 1