Caste certificate of Maratha-Kunbi । मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र (Caste certificate of Maratha-Kunbi, Kunbi-Maratha caste) पात्र नागरिकांना देण्याची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा बुधवारपासून (२२ नोव्हेंबर) राज्यभर दौरा सुरु होणार आहे.
शिंदे समितीची कार्यकक्षा संपूर्ण महाराष्ट्र राज्य करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष आणि सदस्य समितीच्या कामकाजाच्या अनुषंगाने राज्यातील महसूल विभाग, सर्व जिल्ह्यांमध्ये आढावा बैठक घेऊन भेट देणार आहेत. त्यानुसार अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि बुलढाणा (Amravati, Yavatmal, Akola, Washim, Buldhana) या जिल्ह्यांत २२ नोव्हेंबरला सकाळी ११.३० वाजता बैठक होणार आहे. नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली (Nagpur, Wardha, Bhandara, Gondia, Chandrapur, Gadchiroli) या जिल्ह्यांची बैठक २३ नोव्हेंबरला होणार आहे.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत या समितीची बैठक २८ नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. पुणे विभागातील पुणे, सातारा आणि सोलापूर (Pune, Satara, Solapur) जिल्ह्यांत २९ नोव्हेंबरला विभागीय आयुक्तालयात आढावा घेण्यात येणार आहे. नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदूरबार (Nashik, Ahmednagar, Jalgaon, Dhule and Nandurbar) या जिल्ह्यांचा आढावा २ डिसेंबरला समिती घेणार आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी (Sindhudurg, Ratnagiri) जिल्ह्यांचा आढावा ११ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात येणार आहे.
कोकण विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड (Mumbai City, Mumbai Suburbs, Thane, Palghar, Raigad) या जिल्ह्यांचा आढावा कोकण विभागीय आयुक्तालयात (Konkan Divisional Commissioner) घेतला जाणार आहे, असे समिती कक्षाचे उपसचिव विजय पोवार यांनी प्रसृत केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, समितीच्या आढावा बैठकीत संबंधित जिल्हाधिकारी आपापल्या जिल्ह्यात कुणबी दाखले, नोंदणी याबाबत सुरु असलेल्या कामकाजाबाबत सादरीकरण करणार आहेत. तसेच माहिती देणार आहेत.