Shiv Bhojan Thali । कोरोना (Corona) काळात गरीव व गरजू नागरिकांना सुरुवातीला मोफत आणि त्यानंतर नाममात्र केवळ दहा रुपयांत पोटभर जेवण देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने ‘शिवभोजन थाळी’ योजना सुरु केली. मात्र, आता पुण्यातील शिवभोजन थाळी (Shiv Bhojan Thali ) केंद्रांना टाळे लागत असल्याचे दिसून येत आहे. (‘Shiv Bhojan Thali’ center is closed in Pune)
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या महत्त्वाकांक्षी ‘शिवभोजन थाळी’ योजनेला पुणे, पिंपरी-चिंचवड (Pune, Pimpri-Chinchwad)शहरांत आता बोटावर मोजण्यात इतके केंद्र सुरु आहेत. महाविकास आघाडी सरकार जाऊन राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आले. तेंव्हापासून पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांतील तब्बल ५१ केंद्रांना विविध कारणांनी टाळे लागले आहेत. काही केंद्रांमध्ये गैरव्यवहार झाल्याने कारवाई करण्यात आली, तर काही केंद्रचालकांनी परवडत नसल्याने स्वत:हून या योजनेतून माघार घेतली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सन २०१९ मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस (Shiv Sena, NCP, Congress) पक्षांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पुढाकारातून २६ जानेवारी २०२० पासून गरजूंना केवळ दहा रुपयांत ‘शिवभोजन थाळी’तून जेवण देण्यात येत होते. करोना काळात केवळ पाच रुपयांत शिवभोजन देण्यात येत होते. या योजनेला पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे टप्प्याटप्प्याने शहर अन्नधान्य वितरण विभाग आणि जिल्हा पुरवठा विभागाकडून (Foodgrain Distribution Department, District Supply Department) शहरासह जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रे वाढविण्यात आली. ही संख्या महाविकास आघाडी सरकार कोसळेपर्यंत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात ८६ केंद्रे सुरू होती.
दरम्यान, अनेक केंद्रांवर शिवभोजन थाळी (Shiv Bhojan plate) पार्सलद्वारे वितरीत करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. तसेच बहुतांश ठिकाणी वेळेच्या आतच १५० थाळ्या वितरीत होत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आठ ते दहा केंद्रचालकांच्या सुनावण्या घेतल्या. त्यामध्ये केंद्रांवरील मोबाई ॲप आणि सीसीटीव्हीची तपासणी केली. एकाच लाभार्थ्याचे वारंवार छायाचित्र दाखवून थाळी वितरण झाल्याचे दाखविण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित केंद्रचालकांचे परवाने रद्द करण्यात आले.
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या ३५ केंद्रे सुरू आहेत. या केंद्रांवर सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात आले आहेत. अनेक केंद्रचालकांनी स्वतःहून केंद्रे बंद केली आहेत, तर काही केंद्रे गैरव्यवहार झाल्याने प्रशासनाकडून बंद करण्यात आली आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.