पुणे : डायमंडचे देशातील सर्वात मोठे क्लस्टर नवी मुंबईतील महापे येथे स्थापित होणार असून, यामुळे 20 हजार कोटींची गुंतवणूक आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे एक लाख लोकांना रोजगार मिळेल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant) यांनी आज पुणे येथे पत्रकारांशी बोलताना दिली. (India’s largest diamond cluster in Navi Mumbai)
सामंत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार (Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आजही थेट परकीय गुंतवणुकीत देशात क्रमांक एकवर आहे.
रत्ने व आभूषणे क्षेत्रातील केंद्र शासनाची शिखर संस्था म्हणजेच जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलद्वारे (Gems and Jewelery Export Promotion Council) इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क (India Gems & Jewelery Park)नवी मुंबई येथे स्थापित करण्यात येत आहे. या पार्कमध्ये सुमारे 2 हजार सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (Micro, Small and Medium Enterprises) घटक स्थापित होणार आहेत. तसेच येथे मोठ्या नामांकित कंपन्या सुद्धा गुंतवणूक करतील. अशा प्रकारचा देशातील हा एकमेव प्रकल्प आहे, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.
या पार्ककरिता 1 मार्च 2019 रोजी झालेल्या उद्योग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत जेम्स अँड ज्वेलरी पार्ककरिता महाराष्ट्र शासनाने महापे येथे मोकळ्या भुखंडाचे औद्योगिक भुखंडात रुपांतर करून 86 हजार 53 चौरस मीटर एवढी जागा निश्चित करून दिली आहे. मात्र अशा उद्योगांसाठी केवळ जागा उपलब्ध करून होणार नाही तर या उद्योगांना काही प्रोत्साहन आणि सवलती देणे आवश्यक आहे, असा विचार करून उद्योग मंत्रिमंडळ उपसमितीने या उद्योगांसाठी 28 जून 2023 रोजी झालेल्या बैठकित सवलती जाहीर केल्या आहेत.
जेम्स अँड ज्वेलरी पार्क करिता मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला. या पार्क करिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (Maharashtra Industrial Development Corporation) 3 चटई क्षेत्र निर्देशांक यापूर्वी दिलेला आहे. अतिरिक्त 2 एफएसआय देण्याचा निर्णय घेतला. या अतिरिक्त 2 एफएसआय पैकी 1 एफएसआय लॅब ग्रोन डायमंडस् उद्योगासाठी (Lab Grown Diamonds Industry) वापरण्यात येईल. उर्वरीत 1 अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक वापरुन विकसित केलेले क्षेत्र एमआयडीसीला विनामूल्य हस्तांतरीत करण्यात येईल. सदर विकसित क्षेत्र जेम्स ण्ड ज्वेलरी तसेच लॅब ग्रोन डायमंड क्षेत्राशी निगडीत अन्य उद्योगांना देण्याकरीता राखीव ठेवण्यात येईल.
स्थापित होणार्या घटकांकरीता पहिल्या भाडेपट्टा करारावर मुद्रांक शुल्क सवलत असेल. पार्कमधील घटकांना 50 टक्के ढोबळ वस्तू व सेवा कराचा परतावा 5 वर्षेपर्यंत देण्यात येईल. लॅब ग्रोन डायमंडस् उद्योग हा नवीन सेक्टर राज्यात विकसित होण्याकरीता एक विशेष बाब म्हणून या घटकांसाठी 2 रुपये प्रति युनिट दराने 5 वर्षांसाठी विद्युत दरात सवलत देण्यात येणार. सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग घटकांसाठी विद्युत शुल्क माफी 5 वर्षे दिली जाईल. सर्व प्रोत्साहने प्रति घटक पात्र गुंतवणूकीच्या 100 टक्के मर्यादेत देय करण्याचा निर्णय सुद्धा मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे, असेही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.