पुणे : सहकार आयुक्तालयात आणि विभागात रिक्त असणाऱ्या 308 पदे ही सारळसेवा पद्धतीने भरली जात असून, त्यासाठी अर्ज मागवले जात आहेत. उमेदवारांना ऑनलाइन अर्ज (Online application) करण्याची 21 जुलैपर्यत शेवटची मुदत होती. आता तीन दिवसांनी वाढविण्यात आली असून, 24 जुलैअखेर रात्री बारा वाजेपर्यंत वाढविण्याचा निर्णय सहकार आयुक्तालयाने घेतला आहे. (Extension of time to apply for posts in Cooperative Department)
सहकार विभागातील रिक्त पदांच्या भरतीबाबत ऑनलाईन अर्ज करण्याबाबतची जाहिरात 6 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीस अनुसरून अर्ज करण्यासाठीची अंतिम दिनांक 21 जुलै होती. मात्र, शुक्रवारी सर्व्हर डाऊन झाल्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया थांबली होती. त्यामुळे अनेकांना अर्ज भरता आले नाही.
सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी ऑनलाइन अर्ज सादर करण्यास 24 जुलै रोजीच्या रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. संकेतस्थळावर ६ जुलै रोजी प्रसिद्ध जाहिरातीमधील अटी व शर्ती कायम राहतील असेही त्यांनी नमूद केले आहे.
सहकार विभागातील गट क संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी एकूण 309 जागा आहेत. त्यामध्ये सहकार आयुक्तालयातील ९ जागांसह राज्यातील विभागीय सहनिबंधक कार्यालयातील उर्वरित पदे आहेत. या पदांमध्ये लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी, सहकारी अधिकारी श्रेणी एक, सहकारी अधिकारी श्रेणी दोन, लेखापरीक्षक श्रेणी दोन, वरिष्ठ लिपिक किंवा सहाय्यक सहकारी अधिकारी आणि लघु टंकलेखक या पदांचा समावेश आहे.