MH Times Exclusive News । पुणे तिथे काय उणे ! 43 हजार मतदारांच्या मते एकही उमेदवार खासदारकीसाठी पात्र नव्हता म्हणून घेतला ‘हा’ निर्णय
MH Times Exclusive News । पुणे, पुणे जिल्ह्यातील चार लाेकसभा मतदारसंघ असून, त्यात पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यांची मतमोजणी मंगळवारी करण्यात आली. उमेदवारांच्या विजयाची घोषणा झाली. परंतु जिल्ह्यातील चार ही लोकसभा मतदार संघातील ४२ हजार ९४२ मतदारांना एकही उमेदवार खासदार होण्यासाठी पात्र वाटले नाही. त्यामुळे या मतदारांनी नोटा म्हणजेच (NONE OF THE ABOVE) ला मतदान केले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक १६ हजार ७२९ मतदारांनी उमेदवारांना नाकारले आहे. (43 thousand voters used ‘NONE OF THE ABOVE’ option in Pune district) पुणे शहर लाेकसभा मतदारसंघात सर्वात कमी ७ हजार ४४८ मतदारांनी या अधिकाराचा वापर केला आहे. बारामती लाेकसभा मतदार संघातील ९ हजार १३०, शिरुरमध्ये ९ हजार ६३४ मतदारांनी उमेदवारांना नाकारले आहे. (43 thousand voters used ‘NONE OF THE ABOVE’ option in Pune district)
पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघात सर्वांत जास्त नाेटा या अधिकाराचा वापर मतदारांनी केल्याचे दिसून येत आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे (शिंदे गट ) श्रीरंग बारणे यांनी विजयी हॅटट्रीक केली आहे. त्यांच्यासमाेर शिवसेनेचे संजाेग वाघिरे (ठाकरे गट) यांच्यात थेट लढत झाली. या मतदारसंघातील १६ हजार ७२९ मतदारांनी या दाेघांसह इतर उमेदवारांना नाकारले आहे.
पुणे शहर लाेकसभा मतदारसंघात सर्वांत जास्त वडगांव शेरी विधानसभा मतदारसंघात १ हजार ७६३ जणांनी नाेटाचा वापर केला. बारामती लाेकसभा मतदारसंघात सर्वांत जास्त खडकवासला मतदारसंघात ३ हजार २३० जणांनी याचा वापर केला. तसेच बारामती विधानसभा मतदारसंघात ८३७ मतदारांनी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना नाकारले आहे. शिरुर लाेकसभा मतदारसंघात सर्वांत जास्त २ हजार ६५९ जणांनी नाेटाचा वापर केला आहे.
‘नोटा’चा टक्का वाढतोय
2024 लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदार संघात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत नोट पर्याय वापरणाऱ्या मतदारांची संख्या वाढत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 39 हजार 699 मतदारांनी नोटा वापरला होता. त्यात बारामती लोकसभा मतदार संघात 7868,पुणे 11001,शिरूर 5051 आणि मावळ 15779 मतदारांना एकही उमेदवार खासदारकीसाठी पात्र वाटला नाही.