रायगड जिल्ह्यात माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती ; 40 घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती

रायगड : जिल्ह्यातील इर्शाळगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या इर्सालवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळून जवळपास ४० च्या वर घरे मातीखाली गाडले गेले आहेत. त्या वस्तीमध्ये राहणारे बरेच आदिवासी कुटुंब ह्या कोसळलेल्या दरडीखाली अडकून पडले असून, या दुर्घटनेने पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटनेच्या कडू आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या आहेत. (40 houses in Raigad district are feared to be buried under mudslides)

 

खालापुर तहसील प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार दिनांक १९ जुलै २०२३ रोजी २३:४५ वाजताच्या सुमारास इसलवाडी, चौक – मानवली गाव, तालुका – खालापूर, जिल्हा – रायगड याठिकाणी गावातील काही घरांवर दरड कोसळली आहे. मातीच्या ढीगाऱ्या खाली अंदाजे ७० ते ८० नागरिक अडकले असू,  सद्यस्थितीत एकूण ०८ लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरीत लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याचे खालापूर तहसील कार्यालयाकडून माहिती मिळाली. घटनास्थळी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित असून आपल्या ठाणे महानगरपालिका मार्फत ठाणे प्रतिसाद दल (TDRF टीम) मदतीसाठी पाठवण्यात आली आहे.

 

 

रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व स्थानिक पोलिसांकडून MMRCC ह्या डोंगरातील रेस्क्यु हेल्पलाईन वर मदतीसाठी फोन आले. त्वरित यशवंती हाईकर्स खोपोलीची रेस्क्यू टीम मदतीसाठी निघाली. गणेश गीध त्यांच्या रिस्क्यू समुह सह त्वरित मदातीकरिता निघाले. घटनेची माहिती मिळताच इतर काही संस्था, शासकीय यंत्रणा, ग्रामस्थ, ई. देखील मदतीकरिता घटनास्थळी पोहोचले व ह्या सर्वांनी दरड खाली अडकलेल्या आदिवासी कुटुंबीयांना वाचविण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे.

घटना मोठी असल्यामुळे आणि बाधितांना वाचाविण्याकरिता मदतकार्य युद्धपातळीवर व्हावी याकरिता आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी जमेल त्या सर्व संस्थांना मदतीसाठी आवाहन केले.
AMGM च्या महाराष्ट्र राज्य रेसक्यु कमिटीचे समन्वयक पद्माकर गायकवाड हे घटनास्थळी पोहचून MMRCC रिस्क्यु टीमचे समन्वय व घटनास्थळी मदत करत आहेत. घटनेची माहिती मिळताच निसर्गमित्र पनवेल टीम,  हेमंत जाधव त्यांच्या रिस्क्यू समुह सह व शिवदुर्गमित्र लोणावळा टीम हे मदतकार्य करण्याकरीता घटनास्थळी दाखल झाले आहेत.

MMRCC तर्फे ह्या रेस्क्यू कार्यकरिता इतर टीमची जमवाजमव सुरू होती. त्या प्रमाणे अजिंक्य हायकर्स बदलापूर, कर्जत येथील रेस्कयु टीम व इतर संस्था मदतीकरिता रात्री तयारीत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून तीव्र दु:ख व्यक्त

रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खालापूरनजिक इर्शालवाडी परिसरात गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ बचाव व मदतकार्य सुरु केले. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची पाहणी केली, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळीच मंत्रालयात जावून आपत्कालिन नियंत्रण कक्षाची सूत्रे स्वीकारत, बचाव व मदत कार्याचे संनियंत्रण केले. उपमुख्यमंत्री अजित पवार नियंत्रण कक्षातून दुर्घटनास्थळावर उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना बचाव, मदतकार्यासाठी हेलिकॉप्टरसह आदी यंत्रणा तात्काळ उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही पूर्ण केली. दुर्घटनास्थळी उपस्थित मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून त्यांनाही नियंत्रण कक्षास प्राप्त झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

 

 मृत्यु पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

इर्शालवाडी परिसरात घडलेल्या या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून ही दुर्घटना मन पिळवटून टाकणारी, विषण्ण करणारी असल्याचे म्हटले आहे. बचाव पथकानं अनेकांना ढिगाऱ्याबाहेर काढून त्यांचा जीव वाचवला आहे, परंतु काही नागरिक अजूनही ढिगाऱ्याखाली असून त्यांनाही बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जखमी नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आवश्यक वैद्यकीय उपचार केले जात आहेत. सर्व जखमी नागरिक लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे. दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या बांधवांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली असून त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त केली आहे.

 

 

Local ad 1