Recruitment in Social Welfare Department । राज्याच्या समाजकल्याण विभागात सरळसेवेने २१९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ११ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. परीक्षेची तारीख स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे. समाजकल्याण आयुक्तालयातील वर्ग – ३ (Social Welfare Commissionerate) या संवर्गातील विविध पदे सरळसेवेद्वारे भरली जाणार आहेत. त्यात वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक (Senior Social Welfare Inspector) या पदाच्या पाच जागा, समाज कल्याण निरीक्षक या पदाच्या ३९ जागा, गृहपाल (महिला) या पदाच्या ९२ जागा, गृहपाल (सर्वसाधारण) ६१ जागा, उच्च श्रेणी लघुलेखक या पदाच्या दहा जागा, निम्नश्रेणी लघुलेखक या पदाच्या तीन जागा, तर लघुटंकलेखक या पदाच्या नऊ जागांचा समावेश आहे. (219 posts will be recruited through direct service in Social Welfare Department)
पदसंख्या आणि आरक्षणामध्ये बदल झाल्यास त्याबाबतची माहिती संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या संवर्गामध्ये काही मागास प्रवर्ग आणि समांतर आरक्षणाची पदे उपलब्ध नाहीत. मात्र, जाहिरातीत नमूद नसलेले प्रवर्ग, समांतर आरक्षणासाठीची पदे उपलब्ध होण्याची, पदसंख्येत बदल होण्याची शक्यता आहे. जाहिरातीमधील प्रत्येक पदासाठी निश्चित केलेली पात्रता, वयोमर्यादा स्पष्ट करण्यात आली आहे. वयोमर्यादा गणण्याचा दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ आहे.
UPSC कडून दिव्यांग कोट्याद्वारे भरती झालेल्यांची माहिती देण्यास नकार – अक्षय जैन
उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे. एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे. गुणवत्ता यादीत समावेश होण्यासाठी उमेदवाराला परीक्षेत किमान ४५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. यासाठीची दोनशे गुणांची परीक्षा संगणक आधारित असणार आहे. त्यात मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयांचा समावेश आहे. निवड समितीची तयार केलेली निवडसूची एका वर्षासाठी विधीग्राह्य राहील असे नमूद करण्यात आले आहे.